BMM 2022 – सिॲटल् करांची गौरवगाथा
BMM 2022 – सिॲटल् करांची गौरवगाथा
नमस्कार मंडळी,
2022 या वर्षी सिॲटल् करांनी BMM अधिवेशन दणाणून सोडलं. Seattle rocked BMM!
नुकतंच म्हणजे ११ ऑगस्ट २०२२ ते १४ ऑगस्ट २०२२ ह्या चार दिवसात बृहन महाराष्ट्र मंडळाचे २० वे अधिवेशन अटलांटिक सिटी, न्यू जर्सी येथे पार पडले. मराठी अस्तित्वाचा आगळा-वेगळा मराठी संस्कृती जपणारा, त्या बरोबरच नव्या विचारांची ओळख करून देणारा हा सोहळा भव्य स्वरूपात, अत्यंत दिमाखात अनेक नावाजलेल्या (सेलिब्रिटीज) आणि स्थानिक कलाकारांच्या उपस्थितीत साजरा झाला. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, मेळावे, नादरंग, नाट्यरंग अशा स्पर्धा, ढोल-ताशा पथकांचा जल्लोष अशा अनेक गोष्टींनी आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी हे अधिवेशन नटलेलं होतं.
सिॲटल् मधील अनेक गुणी कलाकारांचा ह्यात विशेष सहभाग होता. आणि नुसता सहभागच नाही तर तिथे झालेल्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून सिॲटल् चं नाव उज्ज्वल केलं. त्यांच्या यशाचा आढावा घेण्यासाठी आणि भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
- सर्वप्रथम अभिनंदन करू या SMM २०२२ च्या कार्यकारी समितीची अध्यक्ष सौ. सविता मोरे ह्यांचं.
त्या निवडणूक अतिशय अटीतटीची होती पण सवितानी त्यात बाजी मारली. समितीवर आपल्या कारकीर्दीत BMM मधील कार्यक्रमांमध्ये सिॲटल् करांचा जास्तीत जास्त सहभाग आणि २०२६ चं BMM अधिवेशनाचं यजमानपद सिॲटल् ला मिळणं ह्या दोन गोष्टींवर त्यांचा प्रामुख्याने भर असेल. सविता मोरे ह्यांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!
- BMM अधिवेशनासाठी लक्षवेधक SMM स्टँडी design केली होती कार्यकारी समितीवरील वेबमास्टर अश्विनी क्षीरसागर हिने.
- माणिकमोती: माणिक वर्मा ह्यांच्या आयुष्यातील काही पैलूंची झलक आणि गाण्यावर आधारीत कार्यक्रम.
प्रेक्षागृह तुडुंब भरलेले आणि जवळपास ५०० पेक्षा जास्त लोक ह्या मैफिलीचा आनंद घेत होते. लोकांना कार्यक्रम इतका आवडला की टाळ्यांच्या गजरात प्रेक्षागृह दणाणून सोडलं. हा कार्यक्रम म्हणजे माणिक ताईंच्या काळात घेऊन जाणारा एक सुखद सांगीतिक प्रवास होता. रसिकांचा उदंड प्रतिसाद ही कार्यक्रमाला मिळालेली यशाची पावती ठरली.
मूळ संकल्पनाः शीतल पटवर्धन–बापट, गायन: पल्लवी एकबोटे आणि शीतल पटवर्धन-बापट,
वादन साथ: दीपश्री जोगळेकर((संवादिनी), जयंत भोपटकर आणि आशुतोष गलांडे (तबला), निवेदन: स्नेहल पिटके-कुलकर्णी,
विशेष आकर्षण: बालगोपालांकडून दिलेली स्वतंत्र स्वरांजली. बालगायक: शरंण्या शिळमकर, सानवी कदम, काश्यपी देशपांडे, रेवा गलांडे, गार्गी मोघे, ओजस कुलकर्णी.
- अनुभूती: त्याच दिवशी झालेला दुसरा कार्यक्रम म्हणजे आरती लोटलीकर हिच्या “पंचम सूर” प्रस्तुत ‘अनुभूती’ कृष्ण धवल गाण्यांची सुरेल स्मृती हा जोशपूर्ण कार्यक्रम. कार्येक्रमाला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या नावाप्रमाणेच एका सुरेल स्वर्गीय मैफिलीची अनुभूती प्रेक्षकांना आली. Standing ovation मिळाले. असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत ही इच्छा सर्वांनी प्रगट केली. तुमचाकार्यक्रम मुख्य हॉल मध्ये असायला पाहिजे अशी पण प्रतिक्रिया आली. This is one of the best BMM programs… ही प्रतिक्रिया खूप काही देऊन गेली.
मूळ संकल्पनाः आरती लोटलीकर, गायक: प्रसन्न गणपुले, विभूती कवीश्वर आणि आरती लोटलीकर
वादन साथ: दीपश्री जोगळेकर, जयंत भोपटकर, श्रीराम नंजुंडैय्या आणि आशुतोष गलांडे, प्रख्यात संवादिनी वादक: सत्यजीत प्रभू
निवेदन आणि चित्रफीत निर्मिती: स्नेहल पिटके-कुलकर्णी, तंत्रसहाय्य: संदेश मोघे
सर्व कलाकारांचे अभिनंदन!!! पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा!!!
- स्वयम् प्रकाशी स्वरतारे – गेल्या दोन दशकातील उभरत्या मराठी संगीतकारांच्या गीतांवर आधारित, नृत्य गायनाचा कार्यक्रम ” स्वयं प्रकाशी स्वर तारे” सिॲटल्, ऍरिझोना व न्यूजर्सीच्या कलाकारांनी दि.13 ऑगस्ट रोजी सादर केला. रसिक प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.या कार्यक्रमात सिॲटल् मधील संकेत जोशी ह्यांचा सहभाग होता. त्यांचे खूप अभिनंदन!!!
- BMM 2022 च्या नादरंग ढोल ताशा स्पर्धेचे उपविजेते आणि विज्ञान दिंडी मिरवणूक प्रमुख सहभाग: Shiva Rhythms of India
त्यांनी ह्या स्पर्धेसाठी कसून तयारी केली होती. छोटे पथक आणि स्पर्धेत परफॉर्म करायचा पहिलाच प्रयत्न पण ढोल ताशा वाजवण्याची passion आणि उत्साह, कमी दिवसात केलेली जीव ओतून मेहनत, उत्कृष्ट नेतृत्व आणि स्पर्धा जिंकायचीच हा दृढ निर्धार ह्या बळावर त्यांनी स्पर्धेत उपविजेतेपद मिळवलं आणि सिॲटल् चा डंका न्यू जर्सीत वाजवला. तब्बल २४ स्पर्धक पथकांची ऑडिशन झाली; त्यात अंतिम फेरीमध्ये फक्त ६ पथके निवडली गेली. त्यातही अंतिम फेरीमध्ये आलेली पथके एकास एक तोडीची आणि जबरदस्त टक्कर देणारी होती. स्पर्धा अतिशय चुरशीची झाली. परीक्षकांना निकाल सांगण्यासाठी खूप बारकावे बघावे लागले. त्यासाठी त्यांनी बराच वेळ घेतला. अशा स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवणं ही खूप कौतुकास्पद आणि अभिमानाची गोष्ट आहे. शिवा पथकाचं जोरदार अभिनंदन!!!
संकल्पना आणि नेतृत्व: विनय क्षीरसागर (ढोल), पराग राजोपाध्ये (ताशा)
वादक: ताशा: निखिल देवस्थळी, ढोल: विराज देशपांडे, अर्चना साठ्ये, अद्वैत साठे, समीर परगांवकर, तृप्ती राऊत, संजय राऊत, अमित केळकर,
ध्वज: रमा केळकर
तुमच्या पुढील वाटचालीस तुम्हाला अनंत शुभेच्छा!!
- BMM २०२२ नृत्यरंग स्पर्धा – प्रथम क्रमांकाचे पारितोषिक:
ह्या स्पर्धेसाठी Strings N Beats from Seattle प्रस्तुत थुंगा थुंगा (मूळ नृत्य: पंडीत बिरजू महाराज) हा कथ्थक नृत्याचा बहारदार कार्यक्रम झाला. ह्या नृत्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
नृत्य सादरीकरण: ईशा तरटे आणि तृप्ती राऊत, नृत्य दिग्दर्शन: ईशा तरटे
ईशा तरटे आणि तृप्ती राऊत दोघींनाही त्यांच्या यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा !!!
- BMM २०२२ नाट्यरंग स्पर्धा – उत्कृष्ट अभिनेत्री पारितोषिक: स्वप्नगंधा सिॲटल या संघाने “बदलतात गोष्टीही काळानुसार” ही एकांकीका BMM च्या नाट्यरंग स्पर्धेत उतरवली होती. स्पर्धेत एकूण ४२ एकांकीकांमधून १२ एकांकीका प्राथमिक फेरीत गेल्या. विजय केंकरे, कीरण यज्ञोपवित व अश्विनी भावे या परिक्षकांनी १२ पैकी फक्त 3 एकांकीका अंतिम फेरीसाठी निवडल्या. त्यात ‘स्वप्नगंधा’ सिॲटलची विवेक गरुड लिखित आणि ईशा तरटे व संजय राऊत दिग्दर्शित एकांकीका “बदलतात गोष्टीही काळानुसार” होती. समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा विविध विषयांवर एका विशेष शैलीत भाष्य करणारी ही एकांकीका परिक्षक व प्रेक्षकांना भावली. या एकांकीकेस सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक तृप्ती राऊत व रमा केळकर या दोघींना विभागून देण्यात आले.
नाटकातील सहभागी कलाकार: तृप्ती राऊत, रमा केळकर, मानस राऊत व ओवी केळकर (BMM च्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेली सर्वात लहान कलाकार), नेपथ्य आणि प्रकाश: अमित केळकर, दिग्दर्शन: ईशा तरटे आणि संजय राऊत
- BMM पारितोषिक आणि शिष्यवृत्ती २०२२ साठी परीक्षक मंडळामध्ये श्रद्धा ओक ह्यांची निवड झाली होती.
मानाचा मुजरा: बृहन्महाराष्ट्र मंडळ एक अभिनव सदर घेऊन आले – “मानाचा मुजरा”
आपल्या मराठी समाजामध्ये अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यात उल्लेखनीय आणि भरीव कार्य केले आहे. हा मानाचा मुजरा दर महिन्यात BMM convention तर्फे उत्तर अमेरिका व कॅनडा मधील अशी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आपल्या लोकांना दिला गेला. या वर्षी सिॲटल् मधील मानाच्या मुजऱ्याचे मानकरी ठरले आहेत – विभूती कवीश्वर, अरुण निसरगंड, सुभग ओक, ललितागौरी आगाशे आणि जयंत भोपटकर
या वर्षीचं अधिवेशन सिॲटल् करांनी त्यांच्या उत्कृष्ट सहभागाने आणि घवघवीत यशाने गाजवलं ह्यात वादच नाही. पुढील अधिवेशनात सिॲटल् च्या कलाकारांचे असेच सुंदर कार्यक्रम बघायला मिळोत, सर्व स्पर्धांमध्ये त्यांचा वाढता सहभाग असो आणि त्यात त्यांना यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
जय हिंद!!! जय महाराष्ट्र!!!